युवा बिबट्याचा मृत्यू "अनेक प्रश्न निर्माण करणारा"..!
युवा बिबट्याचा मृत्यू "अनेक प्रश्न निर्माण करणारा"..!
मुरुड-रोहा परिसरासह फणसाड अभयारण्यचे "वातावरण संदेहास्पद"..!
Tv-1india
Special Report
किरण बाथम
गेल्या काही वर्षात जनमानसांत उघड झालेले बिबट्याचे प्रकार अनेक आहेत. मुंबई ठाण्याच्या आसपास काही वर्षांपूर्वी सापडलेले बिबटे मुरुडच्या फणसाड अभयारण्यात सोडण्यात आले होते.यामध्ये खारआंबोली परिसरात रस्त्यालगत फास्कीमध्ये बिबटया अडकला होता. त्याला रेस्क्यू करून काही प्राणीमित्र म्हणवणाऱ्यांनी असा नेला होता की अनेकांना त्यावेळी संदेह वाटला होता.
त्यानंतर उद्योगपती गुलाम पेशीमाम यांच्या बंगल्याच्या कुंपणीला लागून एक बिबटया फास्कीमध्ये सापडला होता. त्याच परिसरात दहशतवादी आल्याच्या अफवा उठल्या होत्या. बहुतेक ते त्यावेळी अवैध शिकारी असावेत.
मुरुड-जंजिरामध्ये नवाबकाळापासून पट्टेरी वाघ, चितळे, हरण, बिबटे, असंख्य प्राणी विद्यमान फणसाड तर नबाबकालीन केसोली जंगलात होते. जंजिराच्या नवाबसाहेबांचे संरक्षित जंगल म्हणजे केसोली जंगल, पूर्वी उन्हाळ्यात नवाबसाहेबांचे वास्तव्य केसोली जंगलात असायचे. त्यांनी अनेक प्राणी जसे शेकरू सारखे विविध तसेच असंख्य झाडे संवर्धीत केली होती. नव्याने शासनाने मुरुड-रोहा भागातील जंगलक्षेत्र केसोलीसह ताब्यात घेऊन फणसाड अभयारण्य विकसित केले. पण पूर्वीचे संरक्षित वनक्षेत्र अनेक वर्षे अवैध शिकार, वृक्षतोड यासाठी नंदनवन बनले.त्यामुळे दोन्ही तालुक्यात अनेकदा संदेहास्पद वावर सुरु असतात.
विपुल जंगल असल्यामुळे फणसाड अभयारण्यासह आजूबाजूला प्राणी चुकून जातात. काही वर्षांपूर्वी बारशीव समुद्रकिनाऱ्यावर एक भलेमोठे हरीण आले होते नंतर मृत्यूमुखी पडले.नांदगाव दांडे परिसरात असेच मोठे सांबरसिंगी हरणे मृतावस्थेत सापडली होती. अनेकदा वाघाच्या कातडंयाच्या व्यवहार प्रकरणात आजूबाजूच्या परिसरात अवैध शिकार करून कातडं विकल्याचे समजत होते.
भालगाव परिसरात असेच एका युवा बिबट्याचा फास्कीमध्ये अडकून मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला. पण सगळं कसं चिडीचूप होतं. कुणी कुणाच्या गावी याची चर्चा करत नव्हतं. सर्पमित्र व निसर्ग प्रणिमित्र संदीप घरत याला याबद्दल सुगावा लागला. त्याने धावपळ करून पशु वैद्यकीय अधिकारी अक्षय सांगळे गेले तेव्हा हा बिबटया एका अवैध शिकारीसाठी लावलेल्या फास्कीमध्ये अडकल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अवैध वृक्षतोड तर अनेकदा कुंपण शेत खातंय असेच दिसते. शिकारी बाबतीत असेच घडण्याचे किस्से ग्रामीण भागात चर्चीले जातात. याला आळा कसा बसणार? जंगल संपत्ती, मत्स्य विकासासाठी खारफुटी, जंगली प्राण्यांचे रक्षण खुप गरजेचे आहे. पण अशा घटना देखील गांभीर्याने न घेता केवळ खानापूर्ती करून प्रकरणे मिटवली जातात. वणव्याच्या नावाखाली जंगलसंपत्ती, विकासाच्या नावाखाली रेती, भली मोठी डोंगरे नष्ट होत आहेत.
खरेतर महाराष्ट्र राज्य वन विभागाने अशा विषयांना गांभीर्याने घेऊन येथील वनसंपदा, वन्यप्राणी टिकवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले पाहीजेत. भालगाव मधील बिबट्याच्या मृत्यू प्रकरणामधून बोध घेऊन आता तरी ठोस उपाययोजना व्हाव्यात अशी सर्वांची भाबडी आशा आहे.
Comments
Post a Comment